१९ व्या शतकामधील प्रबोधन | महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळ आणि त्याची कारणे | महाराष्ट्राचा इतिहास

                 

               

                 महाराष्ट्राच्या इतिहासात 19 व्या शतकाला फार महत्वाचे मानले जाते. या शतकाच्या सुरवातीच्या काळात भारतात इंग्रजी राजवट स्थिर झालेली होती. महाराष्ट्रात सुरू झालेल्या इंग्रजी राजवटीमुळे नव्या युगाचा प्रारंभ झाला. इंग्रजांच्या शिस्तबद्ध नियोजित व कार्यक्षम शासन पद्धतीस सुरवात झालेली होती. त्यामुळे ब्रिटिश पूर्व काळातील महाराष्ट्राच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनातील अराजकता, अशांतता, बेशिस्तपणा व अनास्था याला पायबंद बसला. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात हळूहळू परिवर्तन घडून येण्याची प्रक्रिया सुरू झाली. इंग्रजी राजवटीत महाराष्ट्रात नव्या विचारांचे वारे वाहू लागले. समाजजीवनामध्ये सुरू झालेल्या या परिवर्तनामुळे येथील आर्थिक, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवन ढवळून निघाले. परंतु येथील समाज आपली परंपरागत चालत असलेली जीवन पद्धती व संस्कृति सोडण्यास सहजासहजी तयार नव्हता; परंतु काळाच्या ओघात नवविचारांमुळे सुरू झालेले परिवर्तन तो रोखू शकत नव्हता. समाज एक प्रकारच्या कोंडीत सापडला होता. समाजास या काळात योग्य दिशा दाखवण्याचे, परिवर्तनाचे कार्य याच शतकात झाले.

                पाश्चिमात्य इंग्रजी ग्रंथांच्या अभ्यासामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, उदारमतवाद व बुद्धीप्रामाण्यवाद यांसारख्या मूलभूत संकल्पनांचे ज्ञान समाजाला झाले. नवशिक्षणाने प्रभावित झालेल्या तरुण वर्गाने येथील समाजाचे निरीक्षण केले तेव्हा त्यांना जाणीव झाली की आपल्या समाजातील धार्मिक आचारविचार, जातिसंस्था, अनिष्ठ चालीरीती, रूढी व परंपरा दूर केल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. परिणामी, महाराष्ट्रातील प्रगत व पुरोगामी विचारांच्या विचारवंतांनी येथील क्षेत्रातील म्हणजे राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधनास सुरवात केली.

 

महाराष्ट्रातील धार्मिक जीवन

Ø१९ व्या शतकात महाराष्ट्रातील समाजजीवनात धर्माला फार महत्वाचे स्थान होते.

Ø धर्माची मूलभूत व सत्य तत्वे बाजूला पडली होती.

Ø समाजात आळशी पुरोहितांचा वर्ग निर्माण झाला होता.

Ø पंथ श्रेष्ठत्वाची भावना प्रबळ बनली होती.

Ø धर्माचे खरे व सत्य स्वरूप मागे पडून धर्मात बेबंदशाही निर्माण झाली होती.

 

महाराष्ट्रातील समाजजीवन

Ø १९ व्या शतकात महाराष्ट्रातील परंपरागत रूढ असलेल्या वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्पृश्य-अस्पृश्य इत्यादी बाबतीत कडक निर्बंध लागू होते.

Ø वैज्ञानिक व प्रगत दृष्टीकोनाची कमतरता.

Ø वर्ण व जातीव्यवस्थेमुळे समाज अनेक जाती-उपजातींमध्ये दुभंगलेला होता.

Ø पुरुष प्रधान समाजव्यवस्था.

Ø स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रतिगामी स्वरूपाचा होता.

Ø समाजात सती पद्धत, बालविवाह, विधवा विवाह बंदी, केशवपन, बहुपत्नीत्व व देवदासी इ. अनिष्ठ चालीरीती, रूढी व परंपरा अस्तित्वात होत्या.

Ø इंग्रजांच्या राजवटीमुळे महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात प्रबोधनाची चळवळ सुरू झाली.

 

प्रबोधन : समाजात प्रचलित असलेल्या आचार विचार व व्यवहारात जेव्हा दोष उत्पन्न होतात तेव्हा समाजाला पुन्हा बुद्धिनिष्ठ व विज्ञाननिष्ठ पद्धतीने जागृत करण्याच्या प्रक्रियेला 'प्रबोधन' म्हणतात.

 

चळवळ : विशिष्ट समुदायाने एकत्र येऊन सर्वांच्या हितासाठी केलेला एकत्रित प्रयत्न असतो. एखादी मार्गदर्शक व्यक्ती किंवा विचार प्रणाली त्यामागे असते. त्या प्रेरणेने झालेल्या प्रयत्नास 'चळवळ' म्हणतात.

 

 

  महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीची कारणे


१) पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव :

Ø बुद्धिप्रामाण्यवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रवाद, औद्योगीकीकरण, उदारमतवाद, व्यक्ति स्वातंत्र्य व समता ही पाश्चात्त्यांची विचारसरणी होती.

Ø ब्रिटिशांनी शिक्षणात समतेचे धोरण स्वीकारले.

Ø राज्यकारभार करताना समतेचे व न्यायाचे धोरण अवलंबले.

Ø कायद्याच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करून येथे शांतता निर्माण केली.

Ø लोकांमध्ये आपली संस्कृती व धर्म या विषयीची अस्मिता जागृत झाली आणि त्यांना आपल्या संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाची आवश्यकता भासू लागली.

 

२) पाश्चात्त्य शिक्षणाचा प्रभाव :

Ø ब्रिटिश प्रशासन व ख्रिस्ती मिशनऱ्यांनी कारकून तयार करण्यासाठी व ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी पाश्चात्त्य शिक्षण देण्यास सुरुवात केली.

Ø शिक्षण सर्व जातिधर्मियांसाठी साठी खुले केले.

Ø सुधारकांना आपल्या अधोगतीची व मागासलेपणाची जाणीव झाली.

Ø समाजातील अंधश्रद्धा, खुळचट कल्पना, अनिष्ट चालीरीती, रूढी व परंपरा इत्यादी आपल्या अधोगतीची कारणे आहेत हे समजले.

Ø यातूनच धार्मिक व सामाजिक सुधारणा चळवळी महाराष्ट्रात सुरू झाल्या.

 

३) ख्रिस्ती मिशनरींचे कार्य : 

Ø महाराष्ट्रातील समाजव्यवस्था व येथील परंपरागत धर्म यातील दोष दाखवण्याचे काम ख्रिस्ती मिशनऱ्यांनी केले.

Ø समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी व परंपरा यावर कडाडून टीका केली.

Ø आपल्यातील दोष दूर केल्याशिवाय आपला समाज सुधारणार नाही याची जाणीव येथील समाजसुधारकांना झाली.

Ø महाराष्ट्रातील धर्मसुधारणा चळवळीस व प्रबोधनास चालना मिळाली.

 

 ४) वैज्ञानिक व भौतिक सुधारणा :

Ø ब्रिटिशांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व भौतिक सुधारणा यांचा अवलंब केला.

Ø ब्रिटिशांच्या या भौतिक प्रगतीमुळे ते विकसित आहेत, आपण अविकसित आहोत याची जाणीव भारतीयांना झाली.

 

५) धर्म व विचारप्रसाराची साधने : 

Ø महाराष्ट्रात व सर्व भारतभर ख्रिस्ती धर्माचा प्रसार व प्रचारासाठी ब्रिटिशांनी १९ व्या शतकात मुद्रणकलेचा विकास केला.

Ø बायबल ची भारतीय भाषेत भाषांतरे केली. छापील ग्रंथ तयार केले.

Ø यातूनच महाराष्ट्रातील सुधारकांनी प्रेरणा घेऊन छापखान्यांची निर्मिती केली.

Ø लोकभाषेत वृत्तपत्रे, नियतकालिके, समाज प्रबोधनाची साधने निर्माण केली.

Ø बाळशास्त्री जांभेकर, तर्खडकर बंधू, लोकहितवादी इत्यादींनी प्रबोधनपर लेखन केले.

Ø परिणामी महाराष्ट्रातील समाज जागृत झाला.

 

६) धार्मिक व समाजसुधारणा चळवळी :

Ø ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हिंदू धर्मातील दोष दाखवले आणि टीका केली.

Ø भारतातील धार्मिक जीवन, परंपरा, धार्मिक विचार व आचार यांचा अवमान केला.

Ø त्यामुळे धर्मसुधारणा चळवळीस चालना मिळाली.

Ø सुधारणावादी विचारांच्या लोकांनी अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती, रूढी व परंपरा यांना दूर करण्यासाठी सुधारणा चळवळी सुरू केल्या.

Ø धर्म व समाजसुधारणांचा प्रारंभ प्रथम बंगाल व नंतर महाराष्ट्रात सुरू झाला.

 

           वरील विविध कारणांमुळे महाराष्ट्रात जागृतीस प्रारंभ झाला. धर्म व समाजजीवनातील दोष नष्ट करण्यास सामाजिक परिवर्तनास महाराष्ट्रात सुरुवात झाली. ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज इत्यादींचा उदय झाला. या संघटनांनी सामाजिक एकतेचे, बुद्धिप्रामाण्यवादाचे विचार येथील समाजात रुजवण्यास सुरुवात केली.



संदर्भ : महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता ११ वी.  “जुना अभ्यासक्रम” (मराठी माध्यम)

          Maharashtracha Itihas - standard 11th. “old syllabus” (Marathi Medium)

टिप्पण्या